किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:44 PM2023-09-12T20:44:16+5:302023-09-12T20:44:53+5:30
उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन विशेष ट्रेनने रशियात गेले आहेत.
Nort Koria Russia: उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन (Kim Jong Un) रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्यंची गुप्त बैठक होणार आहे. ही बैठक कुठे होणार आणि या बैठकीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे किम जोंग विमानाऐवजी चक्क ट्रेनने रशियात दाखल झाले. मंगळवारीत त्यांची ट्रेन रशियात पोहचल्यानंतर स्टेशनवर जोरदार स्वागत झाले.
रशियातील व्लादिवोस्तोक शहरात किम जोंग आणि पुतिन यांची भेट होऊ शकते. 2019 नंतर किम जोंग आणि पुतिन यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे अधिकारी जॉन किर्बी यांनी 30 ऑगस्ट रोजी सांगितले होते की, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात शस्त्र कराराबाबत चर्चा सुरू आहे.
शस्त्र-तंत्रज्ञानाचा करार
युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. यामुळेच रशिया आता शस्त्रास्त्रांसाठी उत्तर कोरियाशी हातमिळवणी करत आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षीच रशियाला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे दिली होती. शस्त्रांस्त्र बदल्यात उत्तर कोरिया रशियाकडून तंत्रज्ञान मागू शकतो, असा दावा जॉन किर्बी यांनी केला आहे. असे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. उत्तर कोरियावरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र रशियाकडून तंत्रज्ञान मिळाल्यास त्यांचा शस्त्रसाठा वाढवू शकतो.
दोघांमधील वाढती लष्करी मैत्री
उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी मैत्री लक्षणीयरित्या वाढत आहे. अमेरिकेचा दावा आहे की, सप्टेंबर 2022 मध्ये उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात तोफा आणि दारुगोळा रशियाला दिला होता. जानेवारी 2023 मध्येही उत्तर कोरियाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची खाजगी सेना म्हणवल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे पुरवली होती. एवढेच नाही तर अमेरिकेने उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमेचा एक सॅटेलाइट फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये एक ट्रेन प्राणघातक शस्त्रे घेऊन जाताना दिसत होती.