नवी दिल्ली - उत्तर कोरिया आता अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे हे वास्तव आहे आणि त्या अणुबॉम्बचे बटण माझ्या हाती आहे, असे सांगत उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उननं अमेरिकेला इशारा दिला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उननं अमेरिकेला धमकी दिली आहे.
नववर्षानिमित्त करण्यात आलेल्या भाषणादरम्यान किम जोंग उननं अमेरिकेला ही धमकी दिली आहे. भाषणादरम्यान किम जोंग उननं असेही म्हटले की, अमेरिकेची संपूर्ण जमीन आमच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये येते आणि या क्षेपणास्त्रांचं बटण नेहमीच माझ्या टेबलवर असतं. मी कुणालाही धमकी देत नाहीय पण हे वास्तव आहे. अमेरिका कधीही माझ्यासोबत किंवा माझ्या देशाविरोधात लढाई करणार नाही.
उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा
काही दिवसांपूर्वी,'अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली होती.
‘वा-साँग-१५’ या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाचे हे धाडस हा जगाच्या दृष्टीने धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटल्या आहेत. ४,४७४ किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून ९५० कि.मी. जपानजवळ समुद्रात पडले.
अमेरिकेत कोठेही हल्ला करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे उत्तर कोरियाचे पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी मोठ्या गर्वाने म्हटले होतं. या चाचणीवर अमेरिका, रशिया, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि संयुक्त राष्ट्रानंही चिंता व्यक्त केली होती. उत्तर कोरिया 2018 पर्यंत आण्विक क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात सक्षम होईल, दक्षिण कोरियानं म्हटले होतं.
उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपूर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं आणि अणुबॉम्बचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.