उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा विचित्र नियम बनवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ओळखला जातो. किम जोंग उन याने काही दिवसांपूर्वी लोकांना हसणे, रडणे, खरेदी करणे आणि दारू पिण्यास 11 दिवस बंदी घातली होती. याचे कारण होते त्याचे वडील 'किम जोंग इल' यांची 10वी पुण्यतिथी. म्हणजेच वडिलांच्या निधनाला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे तेथील लोकांवर ही बंदी घालण्यात आली.
नुकताच किम हा पक्षाच्या कार्यक्रमात दिसला. यामध्ये तो खूपच बारीक झाल्याचे दिसत आहे. वजन घटलेले आहे. हा फोटो 28 डिसेंबर 2021 रोजी उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (KCNA) प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये किम जोंग उन सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या बैठकीत खूपच बारीक झाल्याचे दिसत आहे.
वजन घटल्याने त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. रिपोर्टनुसार, त्याला पाहून असे दिसते की त्याचे वजन सुमारे 40 पौंडांनी कमी झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात अन्न कमी असल्याने किम जोंग उन कमी खात आहे. किम याने देशातील नागरिकांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कमी खाण्याचे आवाहन केले होते.
किम पूर्णपणे निरोगी असल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे. याआधीही किम जोंग उन बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते, कारण तो बराच काळ दिसला नव्हता. मात्र नंतर पक्षाच्या बैठकांमध्ये दिसल्याने सर्व दावे खोटे ठरले. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अंदाजानुसार, एकट्या उत्तर कोरियामध्ये यावर्षी सुमारे 860,000 टन अन्नाची कमतरता आहे.