हाँगकाँगमध्ये चीनने सुरक्षा कायदा संसदेत मांडला आहे. यावर हाँगकाँगमध्ये आगडोंब उसळला आहे. चीनची ही दादागिरी हाँगकाँग किंवा तैवानला सहन करावी लागत आहे. एक देश, दोन यंत्रणा यानुसार १९९७ ला हाँगकाँग चीनच्या ताब्यात गेला होता. याद्वारे हाँगकाँगला विशेष अधिकार मिळाले आहेत. यामध्ये न्यायव्यवस्था आणि नागरिकांना स्वातंत्र्याचे अधिकार आहे. ही व्यवस्था २०४७ पर्यंत कायम राहणार आहे. पण, चीननं नवीन सुरक्षा कायदा संसदेत मांडून हाँगकाँगवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनच्या राष्ट्रगीतावरून हा वाद सुरु झाला. हाँगकाँगच्या विधान परिषदेमध्ये यावर विधेयक आणल्याने वाद झाला. लोकशाहीचे समर्थक सदस्यांनी याला विरोध केला. त्यांना जबरदस्तीने विधान परिषदेच्या बाहेर काढण्यात आले. या विधेयकामुळे चिनी राष्ट्रगीताचा अपमान करणे गुन्हा समजले जाणार आहे. यानंतर हाँगकाँगमध्ये आंदोलने होऊ लागली. पण चीनने सैन्य घुसवत आंदोलन हिंसक पद्धतीने दडपले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. यास हाँगकाँग सरकारचा चीनला पाठिंबा होता. हे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे.
आता या आंदोलकांमध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन दिसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तसे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, प्रत्यक्षात ते किम जोंग-उन नसून त्यांचा डुप्लिकेट हॉवर्ड एक्स ( Howard X) आहे. हाँगकाँगमध्ये 1 जुलैला नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या विरोधात रॅली काढण्यात आली. तेव्हा त्यांना नव्या कायद्याबाबत विचारण्यात आले आणि त्यानं उत्तर दिलं की,''हाँगकाँगला दुसरं प्योंगयांग बनवू नका, कारण जगात केवळ एकच प्योंगयांग आहे.'' हॉवर्ड एक्सच्या हातात मिसायलचं खेळणं आहे आणि त्यावर झी यिंग पिंग यांच्या फोटोवर फुल्ली मारलेली आहे.
ऑस्ट्रेलियाचा हॉवर्ड एक्स यापूर्वी एप्रिल महिन्यात हाँगकाँगमध्ये आंदोलकांमध्ये दिसला होता. तेव्हा उत्तर कोरियाच्या किम जोंग-उनच्या प्रकृती खालावल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.