सिओल : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) मॉस्कोला पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी या बैठकीला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएमएने म्हटले आहे की, किम जोंग विशेष ट्रेनने रशियाला जात आहेत. तर दुसरीकडे, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय क्रेमलिननेही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पुतिन यांनी या बैठकीचे निमंत्रण किम जोंग यांना पाठवले होते. ही बैठक सीक्रेट असून त्याची माहिती नंतर जाहीर केली जाईल.
असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरिया-रशिया सीमेजवळ एक विशेष ट्रेन दिसली आहे. ही हिरव्या आणि पिवळ्या रंगाची ट्रेन अनेकदा किम जोंग वापरत असतात, मात्र किम जोंग या ट्रेनमध्ये होते की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही. इतर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, दक्षिण कोरियाच्या सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, ही ट्रेन उत्तर कोरियातील प्योंगयांग येथून निघून मंगळवारी रशियाला पोहोचत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये एकाच दिवशी बैठक होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी संध्याकाळी मॉस्कोमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. हुकूमशहा किम जोंग ट्रेनने रशियाला पोहोचले आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या महिन्यात किम जोंग यांची भेट घेत असल्याचे अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे जॉन किर्बी म्हणाले होते की, रशिया आणि उत्तर कोरिया शस्त्रास्त्रांवर चर्चा करत आहेत.
युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता रशिया उत्तर कोरियाशी शस्त्रास्त्रांसाठी हातमिळवणी करत आहे. यापूर्वी उत्तर कोरियाने रशियाला क्षेपणास्त्रे दिली होती. सरकारी सूत्रांचा दावा आहे की, रशियाप्रमाणेच उत्तर कोरियावरही अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. आता रशियाकडून टेक्नॉलॉजी मिळणार असून उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांची संख्या वाढू शकते. गेल्या वर्षी उत्तर कोरियाने रशियाला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे दिली होती.