प्योंगयांग : उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उनने (Kim Jong Un) लांब पल्ल्याच्या क्रूझ मिसाईलची चाचणी ( cruise missile testing) केली आहे. सरकारी मीडियाने याची माहिती दिली आहे. सांगितले जात आहे की, त्यांच्या क्रूझ मिसाईलने 1500 किमीवरील लक्ष्याचा अचूक भेद केला. उत्तर कोरियाने या मिसाईलला रणनीतिक शस्त्र म्हटले आहे. या चाचणीमुळे पुन्हा एकदा उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील तणावात वाढ झाली आहे. (North Korea says it tested new long-range cruise missiles range 1500 km.)
उत्तर कोरियाने सांगितले की, या मिसाईलच्या परिक्षणावेळी सत्तारुढ वर्कर्स पार्टीचे नेते उपस्थित होते. याशिवाय संरक्षण क्षेत्राचे अधिकारी आणि वैज्ञानिक हजर होते. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने माहिती दिली की, हे मिसाईल परिक्षण 11 आणि 12 सप्टेंबरला करण्यात आले. लांब पल्ल्याच्या या मिसाईलने 7,580 सेकंदांत 1500 किमीवरील लक्ष्य भेदले.
16 ते 26 ऑगस्टला दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्याने युद्धाभ्यास केला होता. यानंतर काही दिवसांनी उ. कोरियाने मिसाईल परिक्षण केल्याने किम जोंग उनच्या बहीणीने अमेरिकेला दिलेले हे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाभ्यासावरून उत्तर कोरिया भडकला होता. अमेरिकेने वॉशिंग्टन आणि सोलची सुरक्षा धोक्यात घातल्याचा आरोप केला होता. किम यो जोंगने अमेरिकेला आणि द. कोरियाला इशाराही दिला होता.
अमेरिकेचे सैन्य जनरल ग्लेन वानहेर्क यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, उत्तर कोरियाने डागलेल्या प्रत्येक मिसाईलचे प्रत्युत्तर देण्यास अमेरिका तयार आहे. काही दिवसांपूर्वी द. कोरियाने देखील किलर पाणबुडीतून समुद्राच्या पाण्यात (SLBM) मिसाईल डागले होते. हा पाणबुडी दुष्मनाला न कळत अनेक दिवस पाण्याच्या आत लपून राहू शकते. आण्विक पाणबुडी नसली तरी ती KSS-III स्टील्थ तंत्रज्ञानाची आहे.