उत्तर कोरियानेदक्षिण कोरियावर 200 राउंड बॉम्ब फेकले आहेत. हे बॉम्ब दक्षिण कोरियाच्या हद्दीत पडले नसले तरी अजूनही या भागात गोंधळाचे वातावरण आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याची माहिती दिली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने दक्षिणेकडील योनपेयोंग बेटावर 200 राउंड आर्टिलरी फायरिंग केलं. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. दक्षिण कोरियाने या कारवाईचा निषेध केला असून याला 'प्रक्षोभक कृती' म्हटलं आहे.
अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव कमी करण्यासाठी करार झाले होते, मात्र या घटनेनंतर हा करार संपुष्टात आला आहे. डिसेंबर 2022 मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेला लागून असलेल्या समुद्रात बॉम्बफेक केली होती. 2010 मध्ये देखील किम जोंग उनने योनपेयोंग बेटावर हल्ला केला होता ज्यात 4 लोक मारले गेले होते.
किम जोंग उनची मुलगी बनेल उत्तराधिकारी
दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता की किम जोंग उन आपल्या मुलीला आपला उत्तराधिकारी बनवू इच्छित आहेत. किमच्या मुलीबद्दल सार्वजनिकरित्या फारशी माहिती नाही. तिचे नावही कोणाला माहीत नाही.
दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमच्या मुलीचे नाव किम जो ए असं आहे. किमची मुलगी किमसोबत अनेकवेळा शस्त्रास्त्र चाचणीच्या ठिकाणी दिसली आहे. दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांच्या मते, लष्कराचे जनरल किमच्या मुलीला सलाम करतात किंवा तिच्यासमोर गुडघे टेकून तिचे स्वागत करतात.