Kim Jong Un Latest Missile Test : उत्तर कोरियाने २०२२ ची सुरुवात क्षेपणास्त्र चाचणीने केली. नुकतेच त्यांनी सुपर-डिस्ट्रॉयर इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून जगाला चकित केलं. उत्तर कोरिया पाच वर्षांत पहिल्या अणुबॉम्ब चाचणीच्या तयारीत असल्याचं वृत्त आता समोर येत आहे. दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी याबाबत स्थानिक माध्यमांना माहिती दिली. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर साईटच्या आजूबाजूला भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यामुळे किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्यावर अणुचाचणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
किम जोंग उन यांचे अधिकारी सातव्या भूमिगत आण्विक स्फोटासाठी पुंगये-री मध्ये आपल्या अण्विक चाचणी स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी 'शॉर्टकट' तयार करत आहेत, असं वृत्त दक्षिण कोरियाई न्यूज एजन्सी Yonhap नं दिलं. उत्तर कोरियाने पाच वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर रोजी शेवटची अणुचाचणी केली होती. दक्षिण कोरियाने हा इशारा अशा वेळी दिला आहे, जेव्हा त्याच्या शेजारी देशाने काही दिवसांपूर्वी ह्वासाँग-17 ICBM च्या चाचणीची पुष्टी केली होती.
किंम जोंग यांनी घेतला फायदाअमेरिकेसोबत दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया आपली अण्विक ताकद वाढवत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर कोरियाचे ICBM हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते अमेरिकेतही विनाश घडवण्यास सक्षम आहे. रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिका आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना उत्तर कोरियाने आपल्या चाचण्या वाढवल्या आहेत.
दक्षिण कोरियाच्या लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी किम जोंग उन यांच्या अणुचाचणीच्या तयारीबाबत नुकताच इशारा दिला आहे. उत्तर कोरिया २०१८ मध्ये चर्चेदरम्यान बंद केलेली भूमिगत चाचणी साइट पुन्हा सुरू करत आहे, असे संकेत आपल्याला मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. उत्तर कोरियाने बोगदा ३ चे प्रवेशद्वार पुन्हा उघडण्यासाठी त्याचे उर्वरित काम थांबवलं आहे आणि बोगद्याच्या बाजूने उत्खनन सुरू आहे असं वृत्त डेलीमेलनं दिलं आहे.