सेऊल- उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांची द. कोरियाच्या सीमेत लष्करमुक्त प्रदेशात आज चर्चा होत आहे. अत्यंत कडक बंदोबस्तातील या चर्चेकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या परिषदेत आशियाच नव्हे तर सर्व जगाच्या शांततेसाठी आवश्यक पावले पडण्याची शक्यता आहे. या चर्चेपुर्वी किम जोंग यांनी द. कोरियाचे अध्यक्ष मून यांना आपण सेऊलला कधीही येण्यासाठी तयार आहोत असे सांगत तुम्ही आमंत्रण दिलं की मी येईन असा प्रतिसाद दिला.
मून यांनी किम यांचे स्वागत करताना आपण ब्लू हाऊस (सेऊलमधील इमारत) मध्ये आलात तर यापेक्षा चांगले आदरातिथ्य करता येईल, तुम्ही दक्षिण कोरियात आला आहात तेव्हा तुम्ही सेऊलला कधी याल असे विचारले त्यावर किम यांनी आपण आमंत्रण द्या मी ब्लू हाऊसमध्ये कधीही यायला तयार आहे असे सांगितले. गेल्या वर्षी उत्तर कोरियाने अनेक अण्वस्त्रांची चाचणी घेतली. त्यामुळे पूर्व आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातीस संबंध अधिकच तणावपूर्ण बनले होते.
असे झाले स्वागत...किम जोंग उन आणि मून जाए यांची भेट ऐतिहासिकच म्हणावी लागेल कारण 1953नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता द. कोरियाची सीमा ओलांडून गेला आहे. किम यांची वाट पाहात उभ्या असलेल्या मून यांच्याशी किम जोंग यांनी हसून हस्तांदोलन केले आणि या ऐतिहासिक जागेवर तुम्हाला भेटताना अत्यंत आनंद होत असून तुम्ही स्वतः सीमेवरती स्वागतासाठी आला याबद्दल मला खरंच भरुन आलं आहे असे किम मून यांना म्हणाले. त्यावर इथं येण्याचा मोठा निर्णय तुम्ही घेतलात असं सांगत मून यांनीही त्यांचे स्वागत केले.