जगातील क्रूर हुकूमशाहांपैकी एक असलेले उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग हे विचित्र नियम लागू करण्यासाठी आणि विचित्र वागण्याबाबत कायमच चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांचे वडील आणि देशाचे माजी सत्ताधीश किम जोंग-इल यांच्या दहाव्या जयंतीनिमित्त त्यांनी देशातील लोकांना ११ दिवस हसणे, मद्यपान करणे, पार्टी करणे, खरेदी करणे इत्यादींवर बंदी घातली होती. मधूनच गायब होणे आणि अचानक पुन्हा ‘अवतीर्ण’ होणे हीदेखील त्यांची ‘खासियत’ आहे. आताही ते असेच अचानक प्रकट झाले. त्यांच्या प्रकटीकरणापूर्वी पुन्हा त्यांच्या तब्येतीबाबत जगभर चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांना पूर्णविराम मिळाला असला तरी त्यांचे जे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत, त्यावरुन त्यांचं वजन आणखी प्रचंड प्रमाणात कमी झाल्याची आणि ते अक्षरश: ‘पातळ’ झाल्याची चर्चा सुरु आहे..
त्यांची ‘प्रतिमा’ इतकी बदलली आहे, की अगदी ओळखूही येऊ नयेत. किम जोंग यांनी किती वजन कमी करावं? त्यांनी तब्बल ४४ पाऊंड म्हणजे साधारण वीस किलो वजन कमी केलं आहे. किम जोंग यांनी मागेही असंच आपलं वजन खूप मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं. त्यांनी वजन खरंच कमी केलंय की आजारपणामुळे त्यांचं वजन कमी झालंय, याबाबत तेव्हा जशा शंका व्यक्त केल्या जात होत्या, तशाच शंका आताही व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या नव्या लूकवरुन जगभरात पुन्हा चर्वितचर्वण सुरू झाले आहे. उत्तर कोरियाचे प्रशासकीय अधिकारी मात्र म्हणतात, की किम जोंग उन हे पूर्णपणे फिट आहेत, त्यांचं वजन कमी झालंय, हे खरं आहे, पण ते आजारपणामुळे कमी झालेलं नाही किंवा आरोग्याच्या दृष्टीनंही त्यांनी ते कमी केलेलं नाही.
देशातील जनता सध्या खूप दैन्यावस्थेतून जात आहे. देशातील अनेक नागरिकांना अक्षरश: उपाशी किंवा अर्धपोटी राहावं लागतं आहे. किम जोंग यांना जनतेचं हे दु:ख आणि त्यांचे हाल पाहवले जात नाहीत, म्हणून त्यांनी स्वत:हूनच आपलं जेवण अतिशय कमी केलं आहे. जनता जर अर्धपोटी राहात असेल, तर मी तरी का भरपेट जेवण करावं, असा त्यांचा सवाल आहे. देशातील नागरिकांनाही त्यांनी जेवण कमी करण्याबाबत आवाहन केलं आहे.
अर्थातच किम जोंग यांचं आवाहन म्हणजे ‘आदेश’च असतो. त्यामुळे नागरिकांना आता सक्तीनं आपल्या जेवणावर, खाण्या-पिण्यावर नियंत्रण आणावं लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे. देशाची स्थिती जोपर्यंत सामान्य होत नाही, तोपर्यंत नागरिकांनीही पूर्ण जेवण घेऊ नये, असं केलं, तरच देशातील गरिबांना आणि इतर नागरिकांना खाण्यासाठी अन्न मिळू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर कोरियामध्ये ८ लाख ६० हजार टन अन्नाची टंचाई आहे. संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषि संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्येही किम जोंग यांनी लोकांना आवाहन केलं होतं की, उत्तर कोरिया आणि चीन यांच्या सीमा जोपर्यंत खुल्या होत नाहीत, म्हणजे किमान २०२५ पर्यंत तरी लोकांनी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं.
उत्तर कोरिया सध्या फारच बिकट अवस्थेतून जात आहे. त्यांची अर्थव्यवस्था कोसळली आहे, जगभरात कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊन, एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळे उत्तर कोरियाचं कंबरडं पार मोडलं आहे. कधी पूर, तर कधी दुष्काळ यामुळे कृषि क्षेत्राचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. २०२० मध्ये आलेल्या महापुराने तर हजारो लोकांना अक्षरश: घरदार सोडून रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यात उत्तर कोरियाच्या महत्त्वाकांक्षी अण्वस्त्र प्रकल्पांच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी लोकांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.
चारही बाजूंनी त्यांना चरकात पिळून घेतले जात आहे. या सगळ्यामुळे नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. उत्तर कोरियाची सरकारी माध्यमं मात्र प्रत्येक गोष्टीचं भांडवल करीत आहेत. आताही किम जोंग यांच्या घटलेल्या वजनाचं कारण त्यांनी देशाच्या संकटाशी जोडलं आहे, एवढंच नाही, तर किम जोंग यांचं इतकं घटलेलं वजन पाहून लाखो नागरिक चिंतीत असल्याचं दाखवून अश्रूंनी ओथंबलेले त्यांचे फोटोही त्यांनी माध्यमांतून प्रसारित केले आहेत. अनेक जाणकारांनी किम जोंग यांच्या क्लृप्त्यांना ढोंग म्हटलं असून ते उत्तर कोरियाचे ‘महात्मा’ बनण्याचा हास्यास्पद प्रयत्न करीत असल्याची टीका केली आहे.
किम जोंग यांचं ढोंग?
किम जोंग यांचं संपूर्ण खानदानच विलासी जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. चंगळवादाचे ते शौकीन आहेत. मद्यपान आणि धूम्रपानाच्या अतिरेकामुळे त्यांच्या घराण्यातील अनेकांना हृदयविकाराचा त्रास झाल्याची पार्श्वभूमी आहे. किम जोंग यांचे वडील आणि आजोबा या दोघांचाही मृत्यू हृदयविकाराने झाला आहे. जाणकारांचं म्हणणं आहे, जनतेशी बांधिलकी म्हणून आपण जेवण कमी केल्याचा जोंग यांचा दावा म्हणजे नाटक आहे. वजन कमी केलं नाही तर त्यांनाही हृदयविकाराचा मोठा धोका आहे, म्हणूनच त्यांनी आपलं वजन कमी केलं असावं.