प्योंगप्यांग - उत्तर कोरियामध्ये छोटीशी चूक एका फोटोग्राफरला इतकी महागात पडली त्याला आपली नोकरी गमवण्याची वेळ आली. बॉसचा फोटो काढत असताना फोटोग्राफर समोर आला अन् बॉसचा फोटो खराब झाला या शिल्लक कारणामुळे फोटोग्राफरला ही शिक्षा करण्यात आली आहे. कारण त्याचा हा बॉस कोणी साधा माणूस नसून हुकूमशहा किम जोंग हा आहे.
इतकी वर्ष किम जोंग यांचे फोटो काढण्यासाठी नोकरीवर असणारा किम जोंगच्या पर्सनल फोटोग्राफरला आपली नोकरी गमावावी लागली आहे. कारण तो 3 सेकंदासाठी किम जोंगच्या समोर उभा राहिला. 10 मार्च रोजी उत्तर कोरियामध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान किम जोंग जनतेला संबोधित करत होता. त्यावेळी किम जोंग यांचा पर्सनल फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी किम यांच्या समोर आला. ही गोष्ट किम जोंगला इतकी खटकली की त्याने या फोटोग्राफरला घरचा रस्ता दाखवला.
री असं या फोटोग्राफरचे नाव आहे. री फोटो काढण्यासाठी उभा राहिल्याने कॅमेराच्या फ्लॅश कव्हरने किम जोंगच्या गळ्याचा भाग झाकला गेला. हा फोटो काढताना फोटोग्राफरने दोन नियमांचे उल्लंघन केले. एक म्हणजे किम जोंग यांचा फोटो काढताना फोटोग्राफरला किम यांच्यापासून 2 मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तर दुसरा नियम म्हणजे किम जोंग यांच्या समोरासमोर उभं राहून फोटो अथवा व्हिडीओ काढण्यात बंदी आहे. री यांनी या दोन्ही नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प आणि किम जोंग यांची भेट झाली होती. या भेटीचे क्षण री यांनीच कॅमेरात टिपले होते.