सिंगापूर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट सिंगापूरमध्ये सेंटोसा बेटावर झाली. सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली. या ऐतिहासिक भेटीत दोघामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी हस्तांदोलन करत बैठकीला सुरुवात केली. या ऐतिहासिक भेटीचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आलेत तर किम जोंग उन यांच्याबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीतील फलनिष्पत्ती चांगलीच असेल, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केला होता. त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च आला आहे.
म्हणून ऐतिहासिक भेटीला महत्व?काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.
उत्तर कोरियाचे सत्ताधीश झाल्यापासून प्रथमच सर्वात लांबचा विमान प्रवास करून किम जोंग उन एअर चायनाच्या विमानाने प्योंग्यागहून येथे पोहोेचले, तर जी-७ देशांच्या शिखर परिषदेसाठी कॅनडात गेलेले ट्रम्प थेट तेथून आले. सोमवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात उद्याच्या चर्चेच्या तयारीसाठी अनेक बैठका झाल्या. उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या घेतल्यामुळे दक्षिण कोरिया अतिशय चिंतेत होता, तर रशियाने उत्तर कोरियावर निर्बंधघातले होते. मात्र त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व किम यांच्या भेटीनंतर उत्तर कोरियाने एक पाऊल मागे घेतले आणि अण्वस्त्र चाचण्या बंद केल्या. तसेच प्रथमच उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले आणि वातावरण अधिक सुधारण्याचे दोघांत मान्य झाले.