प्योंगयांग, दि. 9- उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग हिचा आता कोरियन राजकारणामध्ये आता प्रवेश झाला आहे. उत्तर कोरियात सर्व निर्णय घेणारी संस्था म्हणजे पॉलिट ब्युरोमध्ये तिचा समावेश करण्यात आलेला असून या प्रवेशाला किम जोंग उन यानी मंजूरी दिली आहे. किम जोंग उनकडे पॉलिट ब्युरोचे नेतृत्त्व आहे. किम जोंग उन यांचे वडिल किम जोंग इल यांनी सर्वोच्च अशा जनरल सेक्रेटरी पदाला स्वीकारण्याच्या घटनेस 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पार्टीतर्फे बैठक आणि समारंभ आयोजित करण्यात आला होता. या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
किम यो जोंग आता किम जोंग इल यांची बहिण किम क्योंग हुई यांची जागा घेईल असे सांगण्यात येते. इल यांच्या काळात किम क्योंग हुई यांना निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान होते. किम यो जोंगचा जन्म 1987 साली झाला असून स्वित्झर्लंडमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. 2014 पर्यंत किम यो जोंग प्रसिद्धीच्या झोतात नव्हती. आता मात्र तिला उत्तर कोरियाच्या राजकारणाच्या पटावर येण्याची उघड संधी देण्यात आलेली आहे.
किम जोंग इल यांच्या कुटुंबात अनेक सदस्य असल्यामुळे उत्तर कोरियामध्ये सत्तेमध्ये प्रत्येकाची दावेदारीही असते. किम जोंग इल यांना किम जोंग नाम नावाचा एक मुलगाही होता. बरीच वर्षे त्याला प्रसिद्धीमाध्यमे व कोरियन जनतेपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र नंतर त्याची ओळख कोरियन जनतेशी सत्तेचा आगामी सूत्रधार असल्याप्रमाणे करुन देण्यात आली होती. मात्र तेव्हा किम जोंग नामने सत्तेमध्ये फारसा रस दाखवलेला नव्हता. मॉस्को आणि युरोपात शिक्षण झाल्यानंतर त्याच्यावर झालेल्य़ा पाश्चिमात्य संस्कारामुळे त्याने उत्तर कोरियाच्या बाहेरच राहणे पसंत केले होते. किम जोंग इल यांच्या मृत्यूनंतर किम जोंग उन याने सर्व सत्ता हातात घेतली आणि निर्णयप्रक्रियेतून एकेक स्पर्धकाला बाहेर काढले.
इतकेच नव्हे तर स्वतःच्या काकांनाही त्याने फाशीची शिक्षा दिली. किम जोंग नामची मलेशियामध्ये क्वालालंपूर येथील विमानतळावर अत्यंत रहस्यमय पद्धतीने हत्या करण्यात आली. दोन मुलींनी किम जोंग नामच्या तोंडावर रसायन आणि घातक वायू असलेला रुमाल धरुन काही क्षणांमध्ये मारले होते.