लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय (King Charles III) यांच्या प्रकृतीबाबत बकिंगहॅम पॅलेसकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७५ वर्षीय किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. मात्र, हा प्रोस्टेट कर्करोग नाही. सोमवारपासून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले आहे.
बकिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोगाचे निदान झाल्याचे समजले. डॉक्टरांनी किंग चार्ल्स यांना सार्वजनिक कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे असून त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मात्र, उपचारादरम्यान किंग चार्ल्स हे राजकीय कामे करत राहणार आहेत.
दरम्यान, किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्याच्या माहितीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. यासंदर्भात ऋषी सुनक यांनी यांनी ट्विट केले आहे.
सार्वजनिक कार्यक्रम रद्द!बकिंगहॅम पॅलेसच्या एका निवेदनानुसार, किंग चार्ल्स यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम स्थगित केले आहेत. राजघराण्यातील इतर सदस्य त्यांच्या उपचारादरम्यान त्यांना प्रोत्साहन देण्यास मदत करतील. दरम्यान, किंग चार्ल्स यांच्यावर लंडनमधील खासगी रुग्णालयात प्रोस्टेट शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर ते रविवारी सँडरिंगहॅम येथील चर्चमध्ये दिसले. त्यांनी लोकांशी हस्तांदोलन करून त्यांचे अभिवादन स्वीकारले.
किंग चार्ल्स यांचा अल्पपरिचयराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर किंग चार्ल्स तृतीय हे ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. किंग चार्ल्स हे वयाच्या ७३ व्या वर्षी किंग झालेत. चार्लस यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाला. चार्ल्स हे चार वर्षाचे असताना त्यांची आई एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या.