मॉस्को : सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ गेल्या बुधवारपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौ-यावर होते. रशियात त्यांचे आगमन होणार त्याचवेळी त्यांची जाम गोची झाली. 81 वर्षीय राजे सलमान बिन अब्दुलअझीझ रशियातील मॉस्को विमानतळावर त्यांच्या शाही विमानातून एस्कलेटरद्वारे उतरत होते. त्यावेळी काही तांत्रिक कारणामुळे सोन्याचा मुलामा असलेले हे एस्कलेटर अर्ध्यावर बंद पडले. बंद पडल्यानंतर राजेंना किंचित धास्ती भरली अन् कावरेबावरे झाले. त्यानंतर शांतपणे एस्कलेटरमधील बिघाड दूर होईल, याकडे पाहत होते. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या सहका-यांने त्यांना सावरत हाताला धरुन एस्कलेटरवरुन विमातळावर उतरविले आणि त्यांनी मोकळा श्वास घेतला. याचबरोबर, विमानतळार त्यांचे स्वागत करण्यासाठी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि लष्काराचे बॅंड पथक उपस्थित होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात इतका व्हायरल झाला आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पूर आला.
मध्यपूर्वेतील राजकारणाला नवी दिशाराजे सलमान बिन अब्दुलअझीझ हे सौदीच्या सत्तेवर असताना रशियाला भेट देणारे पहिले राजे आहेत. या भेटीमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मध्यपुर्वेत आपले संबंध बळकट करण्याचे प्रयत्न केले आहेत. सौदी अरेबिया आजवर विमानांची खरेदी इंग्लंड आणि अमोरिकेकडून करत होता. मात्र, रशियाच्या भेटीत सौदीने रशियाकडून एस-400 डिफेन्स सिस्टिम घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच, या भेटीला दोन्ही देशांनी ऐतिहासिक असे संबोधून दोन्ही देशांचे संबंध बळकट होतील अशी अपेक्षा केली आहे. सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात लढणा-या बंडखोरांच्या बाजूने सौदी अरेबिया तर असद यांना रशिया मदत करत आहे. मध्यपूर्वेत इराणचे वाढते बळ ही सौदीला त्रासदायक वाटत आहे, अशा स्थितीत राजे सलमान व व्लादिमिर पुतीन यांच्या चर्चेत सीरियावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.