इस्लामाबाद - भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला आहे. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने किंशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग यांनी पाकिस्तानने किशनगंगा विवादाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा आपला निर्णय बदलावा असा सल्ला गेल्या आठवड्यात दिल्याचे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. सिंधू नदीवरील भारताचे अनेक प्रकल्प हे जागतिक बँकेच्या मध्यस्तीने 1960 साली झालेल्या सिंधू पाणी कराराचे भंग करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून नेहमीच करण्यात येत असतो. जागतिक बँकेने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप निश्चित करण्यासाठी हा करार करवून घेतला होता. सद्यस्थितीत सिंधूनदीच्या पाण्यावर पाकिस्तानमधील सिंचनाखालील 80 टक्के शेतीला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिंधू नदीवर धरण बांधल्यास नदीचा मार्ग बदलेल तसेच पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीमध्येही कमालीची घट होईल, अशी भीती व्यक्त करत या वादाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात व्हायला हवी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. दुसरीकडे भारताने मात्र सिंधू पाणी करारानुसार जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा आपल्याला अधिकार आहे. तसेच यामुळे नदीचा प्रवाह आणि पाणीपातळीमध्ये कोणत्याही प्रकारची घट होणार नसल्याचा दावा केला आहे. या धरणाच्या आराखड्याबाबत पाकिस्तानसोबत असलेला वाद सोडवण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
किशनगंगा प्रकरणी जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका, भारताचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 5:05 PM