दक्षिण कोरियाचे विरोधीपक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर मंगळवारी जिवघेणा हल्ला झाला आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला आहे. पत्रकारांशी बोलत असताना ली यांच्यावर हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. ली यांच्या गळ्यावर हल्लेखोराने वार केले आहेत.
दक्षिण कोरियाच्या योनहॅप न्यूज एजन्सीने याचे वृत्त दिले आहे. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची ओळख पटविण्यात आली असून ती जाहीर करण्यात आलेली नाही. साऊथ कोरियाच्या डेमोक्रेटिक पक्षात ली यांचे बडे प्रस्थ आहे. बुसान येथील गैडियोक बेटावरील नवीन विमानतळाच्या निर्माण कार्याला भेट देण्यासाठी ते आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलत असताना डाव्या बाजुने अचानक त्यांच्या गळ्यावर चाकुचे वार करण्य़ात आले आहेत. हल्लेखोरोना ली यांच्याकडे ऑटोग्राफ मागितला होता. त्यानंतर तो अचानक पुढे सरसावला आणि हल्ला केला. यामुळे सुरक्षा रक्षकांनाही सावरता आले नाही. हल्लेखोर पन्नाशीच्या वयाचा आहे.
2006 मध्ये एका कार्यक्रमात कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे विरोधी पक्षनेते पार्क ग्युन-हाय यांच्यावरही असाच चाकू हल्ला झाला होता. चेहऱ्यावर जखम झाली होती, यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पुढे जाऊन ते साऊथ कोरियाचे अध्यक्ष बनले.