एका संतापजनक घटनेत, हाँगकाँगच्या रस्त्यावरून लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या तरुणीचा एका व्यक्तीने विनयभंग केला.कोरियन तरुणी सोमवारी रात्री हाँगकाँगमधील सहलीचा लाइव्ह व्हिडीओ बनवत होती. तो माणूस तिच्या मागोमाग आला आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचारणा केली. मग, तिचा हात धरला आणि ‘माझ्याबरोबर चल, मी एकटा आहे,’ असे म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तरुणी पुढे चालत असताना अचानक त्याने भिंतीजवळ तिला अडवून विनयभंग करीत चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. हा सर्व प्रकार प्रेक्षकांनी लाइव्ह बघितला. मदतीची याचना करीत ती वारंवार प्रतिकार करीत होती, अखेर तिथून जाणाऱ्या एका प्रवाशाने हस्तक्षेप केल्यावर आरोपी पळून गेला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हाँगकाँग पोलिसांनी संशयित आरोपीला मंगळवारी अटक केली. ४६ वर्षीय अमित नावाच्या भारतीय व्यक्तीला अटक केल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले असले तरी अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.