ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेला आदेश मान्य करणे पाकिस्तानात अनेकांना जड जात आहे.याला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही अपवाद नाहीत. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव हे अजमल कसाबपेक्षा मोठे दहशतवादी आहेत असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केले आहे. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत आहेत.
कसाब फक्त एक प्यादा होता. पण जाधव दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांनी घातपात घडवून पाकिस्तानात अनेकांना ठार मारले असते असा आरोप मुशर्रफ यांनी एआरवाय न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे उघडे पडल्यामुळे पाकिस्तानात अऩेकांचे पित्त खवळले असून असे उलट-सुलट आरोप केले जात आहेत.
नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेणा-या शरीफ यांच्या मते पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात जायलाच नको होते हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. दुस-या कोणाला आपल्या सुरक्षेसंबंधी ठरवण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहा दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी होता. कसाबमुळे भारताच्या हाती मोठा पुरावा लागला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा पडला. आता त्याच कसाबपेक्षा जाधव अधिक धोकादायक होते असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.