लाहोर - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांची आज त्यांची पत्नी आणि आईने भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयने पत्रकार परिषद घेऊन जुन्याचा आरोपांचा पुनरुच्चार केला. 'कुलभूषण जाधव हे दहशतवादी असून भारतीय हेर आहेत'. त्यांनी पाकिस्तानात अनेक दहशतवादी कारवाया केल्या. त्यांना बलुचिस्तानातून अटक करण्यात आली या आरोपांचा पाकिस्तानने पुनरुच्चार केला.
कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर संघटना रॉ चे हस्तक आहेत. कुलभूषण जाधव हा पाकिस्तानातील भारतीय दहशतवादाचा चेहरा असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. मानवतेच्या आधारावर कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
भेटीची वेळ अर्ध्या तासाची होती. पण कुटुंबियांनी वेळ वाढवून मागितल्यानंतर आणखी 10 मिनिट वाढवून देण्यात आली. कुलभूषण जाधव यांच्या बरोबर कुटुंबियांची ही शेवटची भेट नव्हती असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. एक पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी हे सूचक वक्तव्य केले.
या भेटीच्यावेळी सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याने काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती असे मोहम्मद फैसल यांनी सांगितले. या भेटीआधी भारताने अनेक मागण्या केल्या होत्या पण आम्ही त्या फेटाळून लावल्या. या भेटीच्यावेळी भारतीय राजनैतिक अधिकारी जेपी सिंह तिथे उपस्थित होते. त्यांना ही भेट पाहिली पण त्यांना आतमध्ये सोडले नाही असे फैसल म्हणाले.
जाधव यांना इथे चांगल्या प्रकारे ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. आमच्याकडे लपवण्यासारेख काही नाही. पण भारत कुलभूषण जाधव यांच्या दुस-या पासपोर्टबद्दल माहिती द्यायला का टाळाटाळ करत आहे ? असा सवाल त्यांनी केला. जाधव कुटुंबियांना प्रसारमाध्यमांशी का बोलू दिले नाही ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, जाधव कुटुंबालाच प्रसारमाध्यमांशी बोलायचे नव्हते.
तब्बल दीड वर्षांनंतर कुलभूषण यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली. इस्लामाबादस्थित पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात जवळपास 40 मिनिटं ही भेट झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव हे काचेच्या एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा कॉन्स्युलर अॅक्सेस दिला नसला तरी भारताचे पाकिस्तानमधील उप उच्चायुक्त जे.पी. सिंह यांना हे संभाषण काचेतून पाहण्याची मुभा देण्यात आली होती.
मी पाकिस्तान सरकारचा आभारी- जाधवया भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. आई आणि पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकडे केली होती. माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो असं या व्हिडीओत कुलभूषण जाधव म्हणताना दिसत आहेत.