इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल म्हणजे भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया भारतातील दिग्गज नेत्यांनी दिली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निर्णयाचे स्वागत करताना, सत्य आणि न्याय जगासमोर आल्याचं सांगितलं. कुलभूषण जाधव यांना लवकरच न्याय मिळेल, अशी मला खात्री असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान यांनीही ट्विट करुन ICJ च्या निकालाचे स्वागत केले आहे.
पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. विशेष म्हणजे १५-१ अशा फरकानं हा निकाल भारताच्या बाजूनं लागला. यामुळे भारताला मोठा दिलासा असून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर भारतात आनंद साजरा करण्यात आला. तर माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती आजच्या निकालात महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाचे मनपूर्वक स्वागत असे सुषमा यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचा आदेश आयसीजेने दिला आहे. मात्र, या निकालाचे स्वागत करताना इम्रान खान यांनी हा निकाल म्हणजे कुलभूषण जाधव यांची निर्दोष सुटका नव्हे, असे म्हटले आहे.
'आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे कौतुकच, कारण कुलभूषण जाधव हे निर्दोष नसून त्यांना भारताकडे सोपवा किंवा सुटका करा, असे या आदेशात म्हटले नाही. कुलभूषण हे पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात दोषी आहेत. त्यामुळे पुढील कायदेशीर लढाईसाठी पाकिस्तान सज्ज' असल्याचे इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.