इस्लामाबाद : पाकिस्तानात देहदंडाची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मदफैसल यांनी शुक्रवारी येथे सांगितले. हा निर्णय पाकने भारताला कळवला आहे.जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. मात्र आता पाकने व्हिसा जारी केल्याने जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट होईल; पण तेव्हा तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारीही उपस्थित राहतील. जाधव यांची पत्नी आणि आईला तिथे सुरक्षा पुरवली जाईल.स्वराज यांचा पाठपुरावायापूर्वी पाकने जाधव यांच्या पत्नीला पतीला भेटण्यास १० नोव्हेंबर रोजी परवानगी दिली होती. जाधव यांच्या मातोश्री अवंतिका यांना मुलाला भेटण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून व्हिसा द्यावा यासाठी भारताने सातत्याने पाठपुरावा केला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याच प्रश्नावर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल महमूद यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती.कुलभूषण जाधवहे नौदलाचे माजी अधिकारी असून, निवृत्तीनंतर व्यावसायिक कामासाठी ते इराणला गेले असता, तिथे त्यांना पाकिस्तानने अटक केली. ते भारतासाठी हेरगिरी करीत असून, त्यांना ३ मार्च रोजी बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला. त्यांच्या फाशीला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले असून, १३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने आपले म्हणणे सादर करावे, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले आहे.
कुलभूषण यांच्या पत्नी व आईला पाकचा व्हिसा, २५ डिसेंबरला भेट घेणार; भारतातर्फे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:17 AM