बगदाद, दि.25- कुर्दी लोकांनी आपल्या स्वायत्त प्रांतासाठी स्वतःच जनमत चाचणी घेण्यास सुरु केली आहे. या चाचणीसाठी कुर्दीश प्रांत आणि इराकमधील काही अशांत प्रांतांमध्येही मतदान सुरु करण्यात आले आहे. या प्रांतामध्ये तेलाने समृद्ध अशा किर्कुक प्रांताचाही समावेश आहे. या मतदानाचा इराक आणि तुर्कस्थानच्या सरकारने जोरदार निषेध केला असून ही कृती घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.लाखो कुर्दांनी मतदानामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली असून यामुळे इराकमध्ये विविध प्रांतामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कुर्दीश प्रांताचे अध्यक्ष मसूद बार्झोनी यांनी हे मतदान शांततेत पार पडेल अशी अपेक्षा इर्बिल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आम्ही स्वातंत्र्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत असे सूचक आणि धाडसी विधान त्यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे. किर्कुकच्या अध्यक्षांनीही आता आम्ही मुक्त होणार असून आमच्यावर कोणाचेही राज्य असणार नाही अशा शब्दांमध्ये जनमत चाचणी पूर्ण होण्यापुर्वीच आनंद व्यक्त केला आहे.
इकडे इराकचे पंतप्रधान हैदर अल- अबादी यांनी टेलिव्हिजनवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये 'हे मतदान घटनाबाह्य असून, इराकला दिलेली ती धमकीच आहे तसेच इराकी लोकांचं शांततेत चालू असणारं सहजिवन यामुळे धोक्यात आलं आहे' अशा स्पष्ट शब्दांमध्ये जनमताला विरोध केला. तुर्कस्थाननेही कुर्दी लोकांच्या या चाचणीला विरोध केला असून तुर्की परराष्ट्रमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि प्रदेशातील संबंधित देशांनी या प्रक्रियेला मान्यता देऊ नये असे आवाहन केले आहे. या चाचणीमधून काहीही निष्पन्न होणार नाही असे सांगून या चाचणीमुळे इराक व शेजारील देशांमध्ये अशांततेचे वातावरण तयार तयार होईल अशी टीका केली आहे. पहिल्या महायुद्धानंतर मध्य-पुर्वेतील सीमांचे आरेखन झाल्यापासून कुर्द लोकांनी आपली स्वतंत्र प्रांताची मागणी लावून धरली आहे. कुर्द लोक इराण, इराक, तुर्कस्थान, सीरिया अशा विविध देशांमध्ये पसरलेले आहेत.