मुंबई - इराकमधील कुर्दांनी स्वतंत्र कुर्दिस्तानासाठी घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ९२% कुर्दांनी स्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. साहजिकच कुर्दांची आपल्या मागण्यांच्या दिशेने नव्याने वेगवान पावले पडायला सुरुवात झाली आणि कुर्दिस्तानाच्या दिशेने त्यांची वाटचाल होत आहे. अर्थात इराक, इराण आणि तुर्कस्थानने या जनमत चाचणीला कडाडून विरोध केला आहे. एकूण मतदानापैकी २८ लाख,६१ हजार ४७१ लोकांनी स्वातंत्र्याला पाठिंबा दिला असून २ लाख २४ हजार ४६४ लोकांनी व्रधात मतदान केले आहे.
इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी या चाचणीला घटनाविरोधी ठरवले होते तसेच या चाचणीनंतर कुर्दबहुल प्रदेशात इराकी सैन्याच्या तुकड्या पाठवण्यास संसदेने मंजुरी दिली आहे. कुर्दिश प्रांतिय सरकारच्या ताब्यात असणार्या दोन्ही विमानतळांचा ताबा इराक सरकारडे देण्याचा मागणीवजा आदेशही देण्यात आला आहे. आता तर कुर्दांच्या प्रदेशावरुन उड्डाणाची बंदी घालू असा इशाराच इराकने दिला आहे. तर तुर्कस्थानने या चाचणीमुळे मध्यपुर्वेत अशांतता निर्माण होईल अशी आधीच भीती व्यक्त केली होती. त्यानुसार चाचणीनंतर तुर्कस्थानने लष्करी सराव करुन कुर्दांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला.
तर इराणनेही आपण इराकी दहशतवाद्यांचा वापर करुन कुर्दांना आवरु असे संकेत दिले आहेत. कुर्दांच्या जनमत चाचणीने इराक सर्वात जास्त अस्वस्थ होण्याचे कारण म्हणजे या चाचणीत तेलसंपन्न अशा किर्कुक प्रदेशाचाही समावेश आहे. तसेच इतर वादग्रस्त प्रदेशही यामध्ये समाविष्ट झाल्याने इराकने धोक्याची सूचना तात्काळ ओळखून या चाचणीला विरोध सुरु केला. कुर्दिश सरकार आणि बगदाद यांच्यामधील नात्यावर ही चाचणी आता काय परिणाम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिका, इंग्लंड, कँनडा यांनी या चाचणीला आजिबात मान्यता दिलेली नाही आणि मध्यपुर्वेतील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कुर्दांच्या मतानुसार गेली शंभर वर्षे त्यांची मध्यपुर्वेत फसवणूक होत आहे. पहिल्या महायुद्धानंतर त्यांना स्वतंत्र भूमी देण्याएेवदी ब्रिटिश व फ्रेंचानी त्यांना अनेक देशांत विखरुन टाकले. आज ३.५ कोटी कुर्द इराक, इराण, सीरिया, तुर्कस्थान असे विविध देशांत विखुरले गेले आहेत. यापैकी प्रत्येक देशाने कुर्दांवर पाहिजे तसा व शक्य तितका अन्याय केला. सद्दाम हुसेन आणि कुर्दांचे वैर तर सर्वात कडवे समजले जाते. कुर्दांचा अरबीकरण करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. अरबी लोकांना त्यांच्या स्मशानातून अवशेष उकरायला सांगून कुर्दी लोकांच्या भूमीत पुन्हा पुरायला लावण्यापर्यंच सद्दामची मजल गेली होती.
तसेच कुर्दांना विस्थापन करायला लागेल अशी स्थिती निर्माण करणे, त्यांना हाकलणे, त्यांच्या प्रदेशात दुसर्या जमातीचे लोक वसवणे असे प्रयोगही इराकमध्ये वारंवार होत राहिले. तुर्कस्थानने तर कुर्द ही संकल्पनाच अमान्य करत त्यांना डोंगराळ प्रदेशात राहणारे तुर्क अशी संज्ञा दिली होती. आता मात्र कुर्दांच्या चळवळीने नव्याने उचल खाल्ली आहे. स्काँटलंड वेगळं होण्यासाठी जनमत चाचणी होऊ शकते त्याला सगळं जग मान्यता देतं, मग आमच्या चाचणीला विरोधा का? अशी भावना कुर्दांच्या मनात आहे.