Kuwait Building Fire: कुवेतच्या दक्षिण मंगफ येथे बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक हे केरळमधील आहेत. या अपघातात केरळमधील तब्बल २३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय उर्वरित सात वेगवेगळ्या राज्यातील लोकांचाही समावेश आहे.
सर्व ४५ मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने (C-130J) भारतात आणले जात आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे स्वत: या विमानात असणार आहेत आणि ते कुवेती अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. हे विमान प्रथम कोची येथे उतरणार आहे. यानंतर विमान पुन्हा दिल्लीला येणार आहे, कारण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर भारतीय राज्यातील काही लोकांचाही समावेश आहे.
मृतांपैकी किती जण कोणत्या राज्यातील होते?
- केरळ- २३
- तामिळनाडू- ७
- आंध्र प्रदेश- ३
- उत्तर प्रदेश- ३
- ओडिशा- २
- उर्वरित सात वेगवेगळ्या राज्यांमधून प्रत्येकी १ - एकूण ७
इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग
ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत बहुतांश मजूर राहत होते. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली. बुधवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात भीषण आग लागली. आग लागल्याचे पाहून काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, तर काही जणांचा आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.