कुवेतमध्ये बुधवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आहेत. मृतांमध्ये ४० हून अधिक भारतीय नागरिक असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कुवेत सरकारने इमारत मालक आणि इतर लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
एनबीटीसी ग्रुपने दक्षिण कुवेतमधील मंगाफ येथे ही इमारत भाड्याने घेतली होती. या इमारतीत कंपनीने आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीत एकूण १९६ लोक राहत होते, जे की त्या इमारतीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. अनेक रिपोर्ट्समध्ये, मजुरांना कोंबून ठेवलं होतं, जबरदस्तीने या इमारतीत राहण्यास भाग पाडलं जात असल्याचं म्हटलं आहे.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. या सहा मजली इमारतीच्या किचनमध्ये आग लागली आणि नंतर ती संपूर्ण इमारतीत पसरली. येथे राहणारे बहुतांश मजूर रात्रीची शिफ्ट करून परतले होते आणि झोपले होते. आगीमुळे अनेकांना बाहेरही येता आलं नाही. अडगळीच्या जागेमुळे अनेकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी आपापल्या मजल्यावरून उड्याही मारल्या.
गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे की, बहुतेक जणांचा मृत्यू हा आगीत गुदमरल्यामुळे झाला आहे. त्याचबरोबर कुवेतचे अमीर मिशाल अल अहमद अल जबेर अल सबाह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या आगीच्या घटनेत एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे तो म्हणजे संपूर्ण इमारतीसाठी एकच एन्ट्री गेट होता. इमारतीचे छत पूर्णपणे बंद होतं, त्यामुळे मजूर छतावर जाऊन देखील स्वत:ला वाचवू शकले नाहीत.
या आगीनंतर कुवेत सरकार पूर्ण एक्शन मोडमध्ये आले आहे. आगीच्या घटनेनंतर कुवेतचे गृहमंत्री शेख फहाद अल युसूफ अल सबह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात गृहनिर्माण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी मजुरांना नियमांचं उल्लंघन करून अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहण्यास भाग पाडले जात होतं, जेणेकरून कंपनी मालक खर्चात कपात करू शकतील.