लंडन : अल-काईदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. बिन लादेन कुटुंबाचे खासगी विमान दक्षिण ब्रिटनमध्ये उतरत असताना दुर्घटनाग्रस्त होऊन चार जण ठार झाले, अशी माहिती सौदी अरेबियाच्या येथील दूतावासाने शनिवारी दिली. इटलीहून येत असलेले फेनोम ३०० जेट विमान येथून ६० कि. मी. अंतरावरील हॅम्पशायरच्या ब्लॅकबुशे विमानतळावर उतरत असताना शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले. यात वैमानिकासह विमानातील चार जणांचा मृत्यू झाला. सौदीचे राजदूत प्रिन्स मोहंमद बिन नवाफ अल सौद यांनी दूतावासाच्या टिष्ट्वटर हँडलवर बिन लादेन कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत; मात्र त्यांनी मृतांची नावे उघड केली नाहीत. बिन लादेन कुटुंब हे सौदीतील मोठे उद्योग घराणे आहे. द डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मृतांत ओसामाची सावत्र आई रजा हशीम आणि बहीण सना व सनाचा पती जुहैर हशीम याचा समावेश आहे. मृतांचे शव दफनविधीसाठी सौदीला पाठविण्यात येणार असून दुर्घटनेच्या चौकशीसाठी आपण ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहोत, असे सौदीने म्हटले आहे. इटलीच्या मिलान-मल्पेन्सा विमानतळावरून येणारे हे विमान धावपट्टीवरून पुढे निघून गेले आणि तेथील संरक्षक जाळीवर धडकले. त्यानंतर ते उलटून कारचा लिलाव होणार असलेल्या ठिकाणी कोसळले आणि त्याला आग लागली. (वृत्तसंस्था)तीन हजार प्रतिमिनिट एवढ्या वेगाने जमिनीवर आदळलेविमानतळावरील विमानाच्या आवागमनावर देखरेख ठेवणारी कंपनी एवीजेनने दिलेल्या माहितीनुसार, विमान १२५० फुटावर असताना त्याच्याशी संपर्क झाला होता. त्यानंतर ते वेगाने ५०० फुटांवर आले. वैमानिकाने विमान उतरविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते बेकाबू झाले व ३ हजार प्रति मिनिट वेगाने खाली येत जमिनीवर आदळले. विमान जमिनीवर आदळल्यानंतर त्याचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाल्याचे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. - दुर्घटनाग्रस्त विमान सलेम एव्हिएशनच्या मालकीचे असून ही कंपनी बिन लादेन कुटुंबाचीच आहे. बिन लादेन कुटुंबातील सदस्य ठार झाल्याची ही तिसरी विमान दुर्घटना आहे. सौदीच्या उसरान भागात एक विमान तीन सप्टेंबर १९६७ मध्ये धावपट्टीवर दुर्घटनाग्रस्त होऊन ओसामाचे वडील मोहंमद बिन लादेन यांचा मृत्यू झाला होता.
लादेनची सावत्र आई, बहिणीचा ब्रिटनमधील विमान दुर्घटनेत मृत्यू
By admin | Published: August 02, 2015 12:25 AM