सेऊल - उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर प्रोग्राम आणि अणुबॉम्ब चाचणीमुळे आधीच कोरियन द्विपकल्पात तणाव आहे. दुसरीकडे अमेरिकेकडूनही वारंवार आक्रमक भूमिका घेतली जात असून, धमक्या दिल्या जात आहेत. उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.
अमेरिकी काँग्रेसच्या थिंक टँक काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या रिपोर्टच्या हवाल्याने ब्लूमबर्गने होणा-या नुकसानाचा अंदाज लावला आहे. 62 पानांचा हा रिपोर्ट अमेरिकी खासदारांना पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, जर युद्ध झालं तर, कोरियन द्विपकल्पातील जवळपास अडीच कोटी लोक प्रभावित होतील. यामधील एक लाखांहून जास्त अमेरिकन नागरिकांचा समावेश असेल.
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या पारंपारिक शस्त्रांचा वापर केल्यास पहिल्याच दिवशी 30 हजार ते तीन लाख लोक मारले जातील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, उत्तर कोरियाजवळ 10 हजार राऊंट प्रती सेकंद वेगाने फायरिंग करण्याची क्षमता आहे. तसंच एकदा युद्धाची घोषणा झाल्यास यामध्ये चीन, जपान आणि रशियाही उतरु शकतं असा अंदाज रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे.
अमेरिकेसाठी युद्ध खूपच नुकसान देणारं ठरु शकतं. रिपोर्टनुसार, युद्धासाठी मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिक कोरियन द्विपकल्पात एकत्र येतील. अशा परिस्थिती मोठं लष्करी नुकसान होण्याची शक्यता आहे. शक्यता वर्तवण्यात येत आहे की, चीनदेखील युद्धात उडी घेऊ शकतं. युद्धाच्या छळा कोरियन द्विपकल्पाबाहेर जातील, ज्यामुळे होणारं नुकसान खूप मोठं असेल.
गेल्या महिन्यात उत्तर कोरियानं आपल्या सर्वात जास्त शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती, यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्योंगयांगला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची धमकीदेखील दिली होती. यावर, ''उत्तर कोरिया प्रशांत महासागरात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू शकतो'', असे प्रत्युत्तर उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांनी दिले होते.
उत्तर कोरियाचे वरिष्ठ राजदूत रि यॉन्ग पिल यांनी 'सीएनएन'सोबत संवाद साधताना म्हटले की, उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीला अमेरिकेनं गांभीर्यानं घेतले पाहिजे. पिल यांनी पुढेही असेही म्हटले की, ''उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री यांना किम जोंग-ऊन यांच्या हेतूची पूर्णतः जाणीव आहे, यामुळे अमेरिकेनं याकडे गांभीर्यानं पहावं''.