आपल्या घरातील दिवा असो की ट्यूबलाइट, फार तर दोन-तीन वर्षं त्यांचं आयुष्य असतं. काही वेळा त्याआधीच ते बंद होतात आणि आपणही हल्ली दिवेही चांगल्या दर्जाचे नसतात, अशी कुरकुर करतो. अलीकडे तर सीएफएल नको, तर एलईडी बल्ब वापरा, अशा जाहिराती सतत टीव्हीवर दाखवल्या जातात. वीज कंपन्याही असे एलईडी दिवे स्वस्तात ग्राहकांना देतात. एलईडी बल्ब अधिक काळ टिकतात आणि कमी वीज खेचतात, असं सांगण्यात येतं.पण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लिवरमोर शहरातील अग्निशामक दलाच्या केंद्रातील दिवा गेल्या ११७ वर्षांपासून बंद झालेला नाही. तो दिवस-रात्र जळत आहे. इतक्या वर्षांत तो बंद पडला नाही, हे सांगितलं तर कोणाचा विश्वास बसत नाही. पण ते खरं नाही. हल्ली तर ११७ वर्षं सतत उजेड देत राहणारा दिवा पाहण्यासाठी तिथं पर्यटक जात असतात. शिवाय अमेरिकेतले जे कोणी लिवरमोरला जातात, ते अग्निशामक दलाच्या केंद्रात हमखास दिवा पाहायला पोहोचतात. गेल्या ३0 वर्षांत लाखो लोक तो दिवा पाहायला गेले. त्यामुळे केंद्रात ज्या खोलीत तो दिवा आहे, ते ठिकाण पर्यटनस्थळच बनलं आहे. तो पाहण्यासाठी तिकीट लावलं असतं, तर आतापर्यंत त्या केंद्राला लाखो डॉलर्सचं उत्पन्न मिळालं असतं. हा दिवा १९0१ साली लावण्यात आला. नाही म्हणायला तो दिवा दोनदा विझला. पहिल्यांदा १९३७ साली. पण वायर खराब झाल्यानं तसं घडलं होतं. त्यामुळे नवी वायर टाकताच तो पुन्हा पेटला. त्यानंतर २0१३ साली तो पुन्हा बंद झाला. त्याचं कारण होतं १९३७ साली म्हणजे ७६ वर्षांपूर्वी जी वायर टाकण्यात आली होती, ती पुन्हा खराब झाली होती. तेव्हाही नवी वायर लावताच दिव्यातून उजेड आला. इतकी वर्षं आणि तेही२४ तास पेटता राहणारा हा जगातील एकमेव दिवा आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.
117 वर्षांपासून २४ तास जळतोय हा दिवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:31 AM