बीजिंग: नैऋत्य चीनमधील चाँँगक्विंग शहरात विस्मयकारी बांधकाम सुरु आहे. गगनचुंबी इमारत म्हटले की काटकोनात केलेले प्रचंड उंचीचे बांधकाम असे चित्र डोळ्यांपुढे येते. मात्र चाँगक्विंगमध्ये स्थापत्य अभियंते जमिनीला समांतर गगनचुंबी इमारत बांधत आहेत. ‘हॉरिझॉन्टल स्कायस्क्रॅपर’ पद्धतीचे हे जगातील एकमेवाव्दितीय बांधकाम आहे.या ‘हॉरिझॉन्टल स्कायस्क्रॅपर’ ची लांबी ९८४ फूट असून, ६० मजली उंचीच्या चार इमारतींच्या छतावर हे बांधकाम केले जाणार आहे. जमिनीला समांतर ही आडवी इमारत ९८४ फूट उंचीवर असेल. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक बांधकाम सुलभ व्हावे यासाठी ते नऊ निरनिराळ््या तुकड्यांमध्ये करून नंतर एकत्र जोडले जाईल. ज्या चार उभ्या इमारतींच्या छतावर आडवे बांधकाम होणार आहे. त्यांच्या प्रत्येकीच्या लांबीएवढे चार भाग वर छतावरच बांधले जातील. चार उभ्या इमारतींत असलेल्या मोकळ््या जागेएवढ्या लांबीचे तीन भाग खाली जमिनीवर बांधून घेऊन ते ६० मजले उंच उचलून वर बांधलेल्या चार भागांना जोडले जातील. दोन्ही टोकांकडचे शेवटचे दोन तुकडे वरच बांधून हे अखंड बांधकाम पूर्ण केले जाईल. दोन इमारतींच्या मधल्या अंतराएवढ्या लांबीच्या बांधकामाचा प्रत्येक तुकडा १,१०० टन वजनाचा असेल. तो छताच्या पातळीपर्यंत उचलून जोडला आहे. हे काम जून अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.चार इमारतींच्या छतावर आडवे बांधकाम करण्यासाठी काचेचे ३,२०० व अॅल्युमिनियमचे ४,८०० पॅनल्स वापरले जातील. त्यांचे एकत्र वजन १२ हजार टन म्हणजेच आयफेल टॉवरच्या दीडपट किंवा २० एअरबस ३८० विमानांच्या वजनाएवढे असेल . छतावरील बांधकाम पारदर्शी असेल. त्याचे स्वरूप ‘पॅसेज वे’सारखे असेल. ९८ फूट रुंद आणि ७४ फूट उंचीच्या या ‘पॅसेज-वे’मधून एका टोकाकडून दुसºया टोकापर्यंत जाता येईल. एखाद्यास चक्कर येऊ शकेल एवढ्या उंचीवर दोन स्विमिंग पूल, अनेक उपाहारगृहे व निरीक्षण कट्टे (आॅबझर्व्हेशन डेक) असतील. तेथून चाँगक्विग शहरासह तीन कोटी लोकसंख्येच्या चाओतिआनामिन महानगराचे विहंगम दृश्य आणि यांगत्से व जिआलिंग या दोन नद्यांचा संगमही पाहता येईल. (वृत्तसंस्था) ही आडवी गगनचुंबी इमारत हा ‘रॅफल्स सिटी चाँगक्विंग’ या अतिभव्य बांधकाम प्रकल्पाचा भाग आहे.२.७ अब्ज डॉलर खर्चाचे इमारतींचे संकुल १७० फूटबॉल मैदानांएवढ्या जमिनीवर उभारले जात आहे.या संकुलात आठ उभ्या व एक आडवी, जमिनीला समांतर गगनचुंबी इमारती असतील. सहा उभ्या इमारती प्रत्येकी ८२० फूट तर दोन प्रत्येकी १,१४८ फूट उंचीच्या असतील.
जमिनीला समांतर ‘गगनचुंबी इमारत’, स्थापत्यकलेची परिसीमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:41 AM