ऑनलाइन लोकमत -
सेंट बार्ट्स आयलँड, दि. १४ - आपल्याला हवा तसा फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफर काय करतील याचा काही नेम नाही. असाच एका लँडींग विमानाचा फोटो काढण्याचा नादात सेंट बार्ट्स आयलँडवर मेक्की जैदी या फोटोग्राफरने आपला जीव गमावला असता. फोटो काढण्याच्या नादात विमान आपल्या केवढ जवळ आलं आहे याची त्याला कल्पनाच आली नाही. आणि विमान चक्क त्याच्या डोक्यावरुन निघून गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाचं चाक मेक्कीच्या बोटाला चाटून गेलं.
सेंट बार्ट्स आयलँडवरील गुस्ताफ 3 हे विमानतळ जगातील धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. येथील विमाने पॅसेंजर विमानांप्रमाणे मोठी नसतात आणि वैमानिकांनाही विशेष प्रशिक्षण द्यावे लागते. युट्यूबवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या 12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये विमान मेक्की जैदी यांच्या डोक्यावरुन जाताना दिसत आहे. विमानातील अंतर थोडं जरी कमी असत तर कदाचित मेक्की जैदी यांना आपला जीव गमवावा लागला असता. पण नशिबाने ते वाचले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाचं चाक त्यांच्या बोटाला चाटून गेलं. विमान गेल्यानंतरी मेक्की जैदी मात्र फोटो काढताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ खरा आहे की नाही याबाबत काहीजणांनी शंका व्यक्त केली. मात्र मेक्की जैदी यांनी स्वत: इंस्टाग्रामवर त्या विमानाचा फोटो अपलोड करुन ही माहिती दिली आहे. ही घटना घडली तेव्हा सेबेस्टिन पोलिटाने तेथे हजर होते. मेक्की जैदीला कल्पना नाही आहे की तो किती नशीबवान आहे असं त्यांनी म्हंटलं आहे.