जेरुसलेम- इस्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्रायली वायूदलाने आयोजित केलेल्या "ब्लू फ्लॅग" या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे. गेले दोन दिवस हा सराव सुरु असून इस्रायलच्या वायूदलाच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव आहे. या सरावामध्ये अमेरिका, ग्रीस, पोलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत आणि इस्रायलचा समावेश आहे. ( इस्रायलच्या संरक्षण दलांनी एका सहभागी देशाचे नाव जाहीर केलेले नाही.)
दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या सरावामध्ये भारत प्रथमच सहभागी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी इस्रायलला भेट दिली आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि इस्रायल यांचे व्यापारी तसेच राजनयिक संबंध झपाट्याने सुधारत आहेत. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान म्हणूनही ओळखले जातील. त्यामुळेच आता या युद्धसरावात सहभागी झाल्याने दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धींगत होत असल्याचे दिसून येते.
भारत हा अमेरिकेप्रमाणे इस्रायलच्या लष्करी सामुग्रीचा मोठा ग्राहक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्येही इस्रायल भारताला मोठ्या प्रमाणात साहित्य पुरवत आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस वापरली जाणारी उपकरणे, रडार , ड्रोन आदी उपकरणे भारताला इस्रायल पुरवतो. भारत ही लष्करी साहित्यासाठी इस्रायलची मोठी बाजारपेठच आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध संरक्षण साहित्याची देवाणघेवाण वाढिस लागली आहे.