इस्लामाबाद : पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए झांगवीचा (एलजे) प्रमुख मलिक इशाक याची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर उडालेल्या चकमकीत इशाक, त्याची दोन मुले व संघटनेच्या ११ नेत्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही चकमक झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. शिया मुस्लिमांवरील अनेक घातक हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या एलजेची पाकमध्ये प्रचंड दहशत आहे.मुजफ्फरगड जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत इशाक, त्याची दोन मुले उस्मान व हक नवाज आणि संघटनेचे ११ वरिष्ठ नेते मारले गेले. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या चकमकीत सहा पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत, असे पंजाबचे गृहमंत्री शुजा खानजादा यांनी सांगितले. इशाक आणि त्याच्या मुलांना दहशतवाद प्रतिबंधक पथकाने गेल्या आठवड्यात अटक केली होती. पोलिसांनी इशाक, त्याची मुले आणि तीन दहशतवाद्यांना शस्त्रे जप्त करण्यासाठी मुजफ्फरगडच्या शाहवाला भागात नेले होते. तेथून परतत असताना इशाकची सुटका करण्याच्या इराद्याने लष्कर ए झांगवीच्या दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यातून सोडविले आणि ते दुचाकीवर फरार झाले. दहशतवादी ज्या रस्त्याने पळाले होते त्याच रस्त्यावर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या दहशतवाद्यांना आव्हान दिले व धुमश्चक्री झाली. यात १४ दहशतवादी मारले गेले, असे सरकारी सूत्रांंनी वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)
लष्कर-ए-झांगवीचे कंबरडे मोडले
By admin | Published: July 30, 2015 4:09 AM