वॉशिंग्टन : पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबासह सात संघटनांना अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना म्हणून याआधी घोषित केले होते. तो निर्णय अमेरिकेने कायम ठेवला असून त्यामुळे पाकिस्तानची पंचाईत झाली आहे.
पाकिस्तानमधील लष्कर-इ-जंगवी या गटालाही विदेशी दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केले होते. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी कडक कारवाई करत नसल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) करड्या यादीत समाविष्ट केले होते. यापुढील काळात एफएटीएफने जर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले तर त्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारी मदत रोखली जाण्याचा धोका आहे. एफएटीएफची पुढच्या महिन्यात बैठक होणार आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी काय निर्णय घेतले, याचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झकीउर रेहमान लख्वी याने दहशतवाद्यांना पैसा पुरविल्यामुळे त्याला पाकिस्तानी न्यायालयाने १५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर पाकिस्तानातील एका न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. या साऱ्या गोष्टी एफएटीएफला दाखविण्यासाठी पाकिस्तान घडवत असल्याचा संशय आहे.