आताच्या रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांच्यापेक्षाही कित्येक पटींनी शक्तीशाली असलेले सोव्हिएत संघाचे अखेरचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध सुरु झाले होते. हे युद्ध कधी अणुयुद्धात रुपांतरीत होईल, काही सांगता येत नव्हते. हे कोल्ड वॉर एकही रक्ताचा थेंब सांडू न देता संपुष्टात आणले होते. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना शांततेत्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कोल्ड वॉर जरी संपविले तरी ते सोव्हिएत रशियाला वाचवू शकले नाहीत. यानंतर हळूहळू सोव्हिएत रशियाचे पतन झाले आणि देश वेगळे झाले. गोर्बाचेव्ह हे सोव्हिएत युनियनचे अखेरचे अध्यक्ष झाले. गोर्बाचेव्ह यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. ते स्टॅलिनच्या राजवटीत लहानाचे मोठे झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी मॉस्कोमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. कम्युनिस्ट पक्षात त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. साम्यवादात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइका या संकल्पना मांडल्या होत्या.
1985 मध्ये गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे नेते म्हणून निवडून आले होते. ते 1985 ते 1991 पर्यंत सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. 1988 ते 1989 पर्यंत ते सर्वोच्च सोव्हिएटच्या प्रेसीडियमचे अध्यक्ष होते. 1989 ते 1990 सोव्हिएतचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले.