लोकेपिया : केनियातील ओल पेजेटा वन्य अभयारण्यात नॉर्दर्न व्हाईट ऱ्हिनो (पांढरा गेंडा) आहे. त्याच्याकडून वंशवृद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण आता त्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता मावळत आहे. कारण हा गेंडा थकला असून, त्याच्या पायातील बळही कमी होत आहे. त्याचे वय बरेच वाढले आहे, त्याचबरोबर त्याचे स्पर्म काऊंटही कमी होत आहे. त्यामुळे त्याच्यावर चाललेल्या ब्रीडिंग प्रयोगांना यश येण्याची शक्यता कमी होत आहे. पांढऱ्या गेंड्यांच्या प्रजातीतील हा अखेरचा नर असून, त्याचे नाव सूडान असे आहे. पांढऱ्या गेंड्यांच्या प्रजातीचे भवितव्य या गेंड्यावर अवलंबून आहे. पण ओल पेजेटा अभयारण्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी रिचर्ड विग्ने यांच्या मते सूडान थकला असून फारच वृद्ध झाला आहे. तो आता मृत्युशय्येवर आहे. अभयारण्यात सूडानच्या सुरक्षेसाठी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. शिकाऱ्यांपासून त्याला वाचवले जात आहे. जगात चारच पांढरे गेंडे आहेत. त्यात सूडान हा एकमेव नर असून, त्याच्या सोबत दोन माद्या केनियातील अभयारण्यात आहेत. एक मादी अमेरिकेतील सॅन दिएगो अभयारण्यात आहे. (वृत्तसंस्था)-सूडानला २००९ साली दोन माद्यांसह झेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. येथे त्यांच्यावर ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले. ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे; पण सूडानसाठी राबविण्यात आलेला ब्रीडिंग कार्यक्रम अयशस्वी ठरला.
अखेरचा पांढरा गेंडा मृत्युशय्येवर
By admin | Published: July 18, 2015 3:06 AM