इस्लामाबाद - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, बॉलिवूड बादशहा शाहरुख खान, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शोक व्यक्त केला. आता, पाकिस्तानचा माजी फास्ट गोलंदाज शोएब अख्तर यानेही आईंना भेटायची इच्छा अपूर्ण राहिल्याचं म्हटलं आहे.
लतादीदी आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं होतं. लता मंगेशकर यांचे लहान भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर हे क्रिकेट खेळायचे, त्यामुळे लतादीदींना संगीतानंतर क्रिकेट अधिक जवळचं वाटत. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाशी त्यांची विशेष आपुलकी तयार झाली. त्यामुळेच, कपिल देव, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते बनले. त्यातूनच जगविख्यात क्रिकेटर्सही त्यांचे चाहते झाले होते. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने लतादीदींच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. मी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. त्यावेळी, मी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहते, सचिन तेंडुलकर आणि तुमच्यातील सामने पाहिले आहेत. तुम्ही खूप आक्रमक खेळता, तुमचा आवेग प्रसिद्ध आहे, अशा शब्दात लतादीदींनी शोएब अख्तरचं कौतूक केलं होतं. तसेच, मी मुंबईत असल्याने लता दीदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनीही तुम्हाला भेटून खूप गप्पा मारायच्या आहेत, असे म्हटले.
तसेच, तुम्हाला माझं घर माहिती आहे का? असा प्रश्नही लतादीदींनी शोएबला केला होता. त्यावर, तुमचं घर अवघ्या हिंदूस्थानला, जगाला माहिती आहे, असे उत्तर शोएबने दिले. मात्र, लतादीदींचे नवरात्रीचे 9 दिवस उपवास सुरू असल्याने तेव्हा ती भेट शक्य झाली नाही. पण, पुन्हा आल्यानंतर मी नक्कीच भेटायला येईल, असे शोएब अख्तरने म्हटले होते. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आणि आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, अशी आठवण शोएब अख्तरने सांगितली.
इम्रान खान यांनीही वाहिली श्रद्धांजली
इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जगातील एका मोठ्या गायिकेला गमावले आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील लोकांना आनंद मिळाला आहे.
बाबर आझमने वाहिली श्रद्धांजली
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुवर्ण युगाचा अंत. त्यांचा जादुई आवाज आणि त्यांचा वारसा जगभरातल्या कोट्यवधी लोकांसोबत कायम राहील. त्यांच्यासारखा आयकॉन होऊ शकत नाही. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट बाबर आझमने केले आहे.
पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू...
लतादीदींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडालेला असताना सीमेपलीकडेही अनेक चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. शकील अहमद नावाच्या त्यांच्या चाहत्याने लिहिले की, लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:खी झालो. त्यांच्या पुढील जगातील प्रवासात शांती लाभो, भारताला विशेष प्रेम.
पाकिस्तानी पत्रकार आमिर रजा खान यांनी लता मंगेशकर यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करून म्हटले की, कोणाला माहिती होते, ही छोटी मुलगी संगीताच्या जगाची राणी होईल. लताजी तुम्ही आमच्या काळातील एक खरीखुरी महान व्यक्ती आहात. तुम्ही भारत, पाकिस्तान आणि संपूर्ण जगाच्या संगित प्रेमींच्या राणी आहात.