मियामी : संभाव्य धोकादायक सौर हालचाली व खोल अंतराळाच्या दिशेने निघालेल्या भूचुंबकीय वादळांबाबत लोकांना सावध करण्याच्या उद्देशाने ३४० दशलक्ष डॉलर खर्चून तयार केलेल्या उपग्रहाचे बुधवारी अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह ‘स्पेसएक्स फाल्कन ९’ अग्निबाणाने अंतराळात सोडला. अमेरिकी हवाई दल, नासा व नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन यांचा संयुक्त उपक्रम असलेला ‘डस्कव्हर’ हा उपग्रह संभाव्य अंतराळ हवामानाबाबत सतर्क करणार आहे. त्यामुळे या हवामानाला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्यास मदत मिळेल. पृथ्वीच्या रक्षणासाठी हा उपग्रह लाखो मैलाच्या अंतराळ प्रवासावर निघाला आहे. केप कॅनव्हरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आलेला डस्कव्हर पृथ्वी व सूर्यादरम्यानच्या ‘लॅग्रान्जाइन पॉइंट’ वा ‘एल १’ या ठिकाणी जाणार असून तेथे पोहोचण्यास त्याला ११० दिवस लागतील. (वृत्तसंस्था)