भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या होत्या, पण टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अवकाश भरारी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात उड्डाण करणार होत्या. बुच विल्मोर नावाचा आणखी एक अंतराळवीर त्यांच्यासोबत या मोहिमेवर जाणार होते.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, हे यान भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०४ वाजता प्रक्षेपित होणार होते. केनेडी स्पेस सेंटरवरून ते प्रक्षेपित होणार होते. बोईंग स्टारलाइनरच्या माध्यमातून प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी Boe-OFT 2019 मध्ये आणि Boe-OFT2 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.
सुनीता विल्यम्सने याआधी दोनदा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी २००६ आणि २०१२ मध्ये तिने अंतराळ मोहिम केली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार तिने अंतराळात एकूण ३२२ दिवस घालवले आहेत. २००६ मध्ये सुनीताने १९५ दिवस अंतराळात आणि २०१२ मध्ये १२७ दिवस अंतराळात घालवले होते.
२०१२ च्या मिशनमध्ये सुनीताने तीनदा स्पेस वॉक केले. अंतराळवीर स्पेस वॉक दरम्यान स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतात. मात्र, पहिल्या प्रवासात त्यांनी चार वेळा स्पेस वॉक केला. सुनीता विल्यम्स या अंतराळात प्रवास करणारी भारतीय वंशाची दुसरी महिला आहे. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या.