ऑनलाइन लोकमत
बुडापेस्ट, दि. ९ - सीरियातून आलेल्या निर्वासितांना लाथ मारणे हंगेरीतील महिला पत्रकाराला चांगलेच अंगलट आले आहे. निर्वासितांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संबंधीत वृत्तसंस्थेने तिला कामावरुन काढून टाकले आहे.
हंगेरी - सर्बिया सीमा रेषेवरील रोज्के या गावातील शिबीरात थांबलेल्या निर्वासितांंचा संयम तुटला व निर्वासितांचा जमाव पोलिस बॅरिकेड तोडून हंगेरीच्या दिशेने पळू लागला. निर्वासितांच्या बातमीच्या वृत्तांकनासाठी गेलेली पेट्रा लाझलो ही एका वृत्तवाहिनीत कॅमरामन म्हणून काम करते. निर्वासित व पोलिसांमधील संघर्षाचे चित्रीकरण करत असताना पेट्राने कडेवर लहान मुलाला घेऊन पळणा-या पित्याला लाथ मारुन पाडले. तर पोलिसांच्या तावडीतून पळ काढणा-या लहान मुलालाही तिने पाडण्याचा प्रयत्न केला. पेट्राचे हे कारनामे कॅमे-यात झाले व हा व्हिडीओ सोशल मिडीयावरही व्हायरल झाला.
पेट्रा लाझलोच्या वर्तनावर सर्वत्र टीका सुरु झाल्यावर पेट्रा ज्या वृत्त समुहासाठी काम करत होती त्या वृत्त समुहाने पेट्राला कामावरुन काढून टाकले. 'पेट्राचे वर्तन हे आक्षेपार्हच होते' असे या वृत्तसमुहाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.