चंद्रयान लाँच केले याचा अर्थ हा नाही की...; युक्रेनचे भारतविरोधी वक्तव्य, आक्षेपार्हच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 03:18 PM2023-09-14T15:18:36+5:302023-09-14T15:19:25+5:30
म्हणे भारताची बौद्धिक क्षमता कमकुवत... दिल्लीतील दुतावासाकडून सारवासारव करण्यास सुरुवात.
रशियाच्या हल्ल्यात पार होरपळून निघालेल्या युक्रेनने भारताच्या चंद्रयानावरून संतापजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाईलो पोडोल्याक यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु झाला आहे. तो वाढल्याचे पाहताच युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पोडोल्याक त्यांच्या वक्तव्यावरून पलटले आहेत.
आपले वक्तव्य बदलून दाखविण्यात आल्याचा आरोप पोडोल्याक यांनी रशियावर केला आहे. भारत चंद्रयान प्रक्षेपित करत आहे पण याचा अर्थ आधुनिक जग त्यांना समजला आहे, असे होत नाही. भारत, चीन, तुर्कस्तानची समस्या काय आहे? त्यांची समस्या अशी आहे की ते जे काही करत आहेत त्याचे परिणाम काय होतील याचे विश्लेषण ते करत नाहीत. दुर्दैवाने या देशांची बौद्धिक क्षमता कमकुवत आहे. ते विज्ञानामध्ये गुंतवणूक करतात हे ठीक आहे. भारताने चंद्रयान देखील लॉन्च केले आहे आणि त्याचे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर मागोवा घेत आहे. परंतु यामुळे हे सिद्ध होत नाही की या देशांना आधुनिक जग कशाला म्हणतात ते पूर्णपणे समजले आहे, असे पोडोल्याक म्हणाले होते.
यावरून टीका होऊ लागताच युक्रेनी दुतावासांनी आपणहूनच स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीय. दिल्लीतील युक्रेनच्या दूतावासाने पोडोल्याक यांच्या मतांना समर्थन देत नाही, असा खुलासा केला आहे.
हे पोडोल्याक यांचे वैयक्तिक विचार आहेत. त्यांनी जे म्हटलेय ते युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत वक्तव्य नाहीय, असे दुतावासाने म्हटले आहे.