हॉंगकॉंग - शहरातील एक 23 वर्षाचा मुलगा, ज्याने केलेल्या आंदोलनामुळे जगातील बलाढ्य असा चीन देशासमोर आव्हान उभं राहिलं आहे. या मुलाचं नाव जोशुआ वॉन्ग आहे. हॉंगकॉंग प्रशासनाने एक विधेयक आणलं आहे. या विधेयकात जर कोणी व्यक्ती सरकार अथवा प्रशासनाविरोधात आंदोलन करत असेल तर त्याला चीनमध्ये आणून त्याच्यावर खटला चालविण्यात येईल असं नमूद केलं आहे. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वॉन्ग याने समर्थकासोबत रस्त्यावर उतरुन संघर्ष सुरु केला आहे.
मागील काही दिवसांपासून हॉंगकॉंगच्या रस्त्यावर लाखो लोकं या विधेयकाचा निषेध करत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा परिणाम हॉंगकॉंगच्या विमानसेवेवरही झाला आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी हॉंगकॉंगमधील प्रमुख विमानतळावर कब्जा केला. त्यामुळे एकही विमान उड्डाण घेऊ शकलं नाही. एअर इंडियानेही हॉंगकॉंगला जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सगळे आंदोलनकर्ते युवावर्गाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
युवा आंदोलनकर्त्यांनी महाशक्तिशाली चीनसारख्या देशाच्या नाकात दम आणला आहे. मुख्यत: या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा नेता हा 23 वर्षीय जोशुआ वॉन्ग ची-फंग हा आहे. इतकचं नाही तर त्याच्या पक्षातील सर्वाधिक नेते 20-25 वयोगटातील आहे.
आंदोलनातील मागण्या काय आहेत?हॉंगकॉंगमधील युवकांमध्ये प्रशासनाकडून आणण्यात येणाऱ्या विधेयकाबद्दल संतप्त भावना आहेत. चीनमधील कम्युनिस्ट पार्टी या विधेयकाच्या माध्यमातून हॉंगकॉंगमधील युवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. हॉंगकॉंग हा चीनच्या विशेष अधिकारात येतो. युवकांच्या दबावापुढे प्रशासनाने हे विधेयक मागे घेण्याचं ठरवलं आहे मात्र अद्यापही आंदोलन शमण्याचं चिन्ह दिसत नाही. जास्तीत जास्त लोकाधिकार लोकांना द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.
कोण आहे आंदोलनकर्त्यांचा नेता?जोशुओ वॉन्ग ची-फंग हॉंगकॉंगमध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डेमोसिस्टो पक्षाचे महासचिव आहे. राजकारणात येण्याआधी त्यांनी स्टूडेंट ग्रुप स्कॉलरिजमची स्थापना केली होती. वॉन्ग 2014 मध्ये देशात आंदोलन केल्यानंतर जगभरात प्रसिद्ध झाले होते. टाइम या पत्रिकेनेही 2014 मध्ये सर्वात प्रभावी युवा म्हणून गौरव केला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी 2018 मध्ये त्यांचे नोबेल पीस प्राइज यामध्ये नामांकन करण्यात आले होते.