इस्लामाबाद : राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला याचे गमक जाणून घ्या, असा सल्ला पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तेथील लष्करी अधिकाऱ्यांना दिला आहे.जनरल बाजवा यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रावळपिंडी येथील लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यापासूनच्या गेल्या सात दशकांपैकी निम्म्याहून अधिक काळ पाकिस्तानात लष्करी राजवट राहिली आहे. तेथील सत्ताकारणात लष्कर नेहमीच वजनदार भूमिका बजावत असते. परंतु जनरल बाजवा यांना लष्कराने राजकारणात पडणे अजिबात मान्य नाही व लष्कराने लोकशाही शासनव्यवस्थेत आपली मर्यादा ओळखून राहावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.याच संदर्भात त्यांनी भारताचे उदाहरण दिले व तेथील लोकशाही लष्कराला राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. या अनुषंगाने जनरल बाजवा यांनी भारतविषयक एक अमेरिकी अभ्यासक स्टिव्हन आय. विल्किन्सन यांनी लिहिलेले ‘आर्मी अॅण्ड नेशन: दि मिलिटरी अॅण्ड इंडियन डेमॉक्रसी’ हे पुस्तक आवर्जून वाचण्याचा सल्ला दिला. विल्किन्सन हे येल विद्यापीठात निलेकेनी अध्यासनाचे प्राध्यापक आहेत.सन २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेले हे पुस्तक अमेरिकेत व भारतातही टिकाकारांकडून वाखाणले गेले. भारतीय लोकशाही व्यवस्थेने लष्कराला राजकारणापासून अलिप्त ठेवण्यात कसे व का यश मिळविले याचे अभ्यासपूर्वक विवेचन त्यांनी या पुस्तकात केले आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय लोकशाहीच्या यशाचे गमक जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:43 AM