ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 20 - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्थिक पाठबळ कमी असतानाही भारतानं आज अवकाश विज्ञानात विक्रमी झेप घेतली आहे. त्यामुळेच अवकाश संशोधनात भारताच्या इस्रोनं केलेल्या प्रगतीनं इतर देशांना धडकी भरली आहे. चीन हा अवकाश विज्ञानात भारताच्या खूप पुढे आहे. मात्र तरीही चिनी मीडियानं अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत करत असलेल्या रोजगार निर्मितीचा इतर देशांनी धडा घ्यावा, असा सल्ला दिला आहे. भारतानं कमी खर्चात अवकाशात 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे भारतासाठी अवकाश संशोधन क्षेत्रात नोक-या उपलब्ध होणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत भारतानं व्यावसायिक जागा निर्माण केली आहे, असं मायक्रोसॅटेलाइटच्या शांघाई इंजिनीअरिंग सेंटरचे नवे विभाग निर्देशक झांग योंगे म्हणाले आहेत. (इस्रोचे सामर्थ्य; प्रगत देशांना धडकी)चीननं इतर कम्युनिस्ट देशांना सतर्कता बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. इस्रोनं गेल्या आठवड्यात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करून रशियाच्या 37 उपग्रह सोडण्याच्या विक्रम मोडीत काढला. भारताला कमर्शियल अवकाश प्रक्षेपणात प्रतिस्पर्धी देशांचं पाठबळ मिळाल्यानं भारत हे साध्य करू शकला. चीनलाही उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी मार्केटमधील शेअर वाढवण्याची गरज असल्याचंही मत ग्लोबल टाइम्समधून व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच अवकाश प्रक्षेपणात भारताला मिळालेल्या नेत्रदीपक यशातून चीनलाही बरंच काही शिकण्याची गरज असल्याचंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.
भारताकडून शिका स्पेसमधून पैसे कसे कमावतात- चिनी मीडिया
By admin | Published: February 20, 2017 3:56 PM