काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दोन मोठे बॉम्बस्फोट झाले आहेत. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काबूल शहरातील क्रीडा संकुलात बुधवारी संध्याकाळी हे स्फोट झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. काबूलमध्ये बुधवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाले. यातील पहिला स्फोट कला-ए-नजरिया परिसरातील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाला. एका आत्मघाती हल्लेखोरानं हा स्फोट घडवला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले. यानंतर लगेचच दुसरा बॉम्बस्फोट झाला. यात 6 जण मृत्यूमुखी पडले. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'मी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. या हल्ल्यात अनेक अॅथलिट्स, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही दहशतवादाविरोधात देश म्हणून एकत्र आहोत, याची आमच्या शुभचिंतकांना कल्पना आहे', असं करझाई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट; 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 8:14 AM