बीजिंग – चीनच्या युन्नान प्रांतात आलेल्या एका मागोमाग एक भूकंपाच्या धक्क्याने चीनची जमीन हादरली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून २७ पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी आहेत. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे प्रमुख यांग गुओजोंग यांनी सांगितल्याप्रमाणे दाली शहरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले परंतु यांग्बी येथे त्याचा परिणाम सहन करावा लागला. यांग्बी काऊंटी येथे २ लोकांचा तर योंगपिंग काऊंटीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुंआ यांनी सांगितल्याप्रमाणे भूकंपाच्या तीव्र धक्क्याने ३ लोकांचा मृत्यू झाला असून २७ हून अधिक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे २० हजार १९२ घरांमध्ये राहणारे तब्बल ७२ हजार ३१७ रहिवासी प्रभावित झाले. चीन भूकंप नेटवर्क केंदाने दिलेल्या माहितीत म्हटलंय की, यांग्बी येथे रात्री ९ ते ११ पर्यंत ५.० रिश्टर तीव्रतेचे ४ भूकंपाचे धक्के जाणवले. याच परिसरात रात्री २ च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. बचाव पथकांना भूंकप प्रभावित भागात पाठवण्यात आलं असून मदत कार्य सुरू आहे.
शिन्हुआने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत उत्तर पश्चिम चीनच्या किनघाई प्रांतात शनिवारी ७.४ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीजिंगच्या वेळेनुसार शुक्रवारी रात्री २ वाजून ४ मिनिटांनी यून्नान प्रांताच्या वायव्येकडे ६.४ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. मागील वर्षीही यून्नानमध्ये आलेल्या भूकंपात चीनमध्ये ४ लोक मृत्युमुखी पडले होते तर २३ जण जखमी झाले होते. २००८ मध्ये चीनच्या यून्नानच्या उत्तरेस असलेल्या सिचुवान प्रांतात आलेल्या भूकंपामुळे जवळपास ९० हजार लोकांचा मृत्यू झाला होता.