ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. २ - संयुक्त राष्ट्रातील महासभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानने दहशतवाद सोडून चर्चेला बसावे हा एकमेव पर्याय असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर पाकने संयुक्त राष्ट्राला डोजियर सोपवत दहशतवादाचे खापर भारतावरच फोडले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रातील भाषणात काश्मीर प्रश्न मांडला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरीफ यांनी चार पर्यायही दिले होते. शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले. 'काल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चार सूत्र मांडले होते. पण मी म्हणीन पाकसाठी फक्त एकच सूत्र महत्त्वाचे आहे. पाकने दहशतवाद सोडून चर्चेसाठी बसावे असे स्वराज यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरत आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सभेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुषमा स्वराज यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. भारताच्या उत्तरानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे डोजियर सोपवत पाकमधील दहशतवासाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप करत भारताविरोधातील 'पुरावे'ही सादर केल्याची माहिती पाकच्या अधिका-यांनी दिली आहे.