तेल अवीव : लेबनाॅनने इस्रायलमध्ये केलेल्या दाेन राॅकेट हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार विदेशी कामगारांचा समावेश आहे. लेबनॉन व गाझा पट्ट्यात इस्रायलने शस्त्रसंधी लागू करावी या मागणीसाठी अमेरिका प्रयत्नशील असतानाच इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याने तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायली लष्कराने लेबनॉनवर या महिन्याच्या प्रारंभी हल्ले चढविले होते. तेव्हापासून लेबनॉनने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. इस्रायलच्या उत्तर भागात झालेल्या या हल्ल्यामागे हिजबुल्ला संघटना असल्याचे सांगितले जाते. त्यात मरण पावलेल्या चार विदेशी कामगारांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. (वृत्तसंस्था)
इस्रायलसमाेर आव्हान - हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला चढविला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. हिजबुल्ला व हमासला इराणचे पाठबळ आहे. - इस्रायल आता एकाच वेळी लेबनॉन, पॅलेस्टाइन अशा आघाड्यांवर लढत आहे. इराणमधूनही काही दिवसांपूर्वी इस्रायलवर हल्ला झाला होता. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.