Lebanon Walkie-Talkie Blast, Hezbollah: पेजर स्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झाले आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार हे स्फोट वॉकीटॉकी (Walkie Talkie Blast) आणि काही जुन्या रेडिओ-लॅपटॉप व मोबाईलच्या माध्यमातून झाले. स्फोट झालेले पेजर (pager blast) हे हिजबुल्लाहचे सैनिक वापरत होते. आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्था एएफपीनुसार, लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, वॉकी-टॉकीजमधील ताज्या स्फोटांमध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सी (NNA) ने म्हटले आहे की, दक्षिणेकडील बेका खोऱ्यातील सोहमर शहरात 'डिव्हाइस'मध्ये झालेल्या स्फोटांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण लेबनॉनमधील बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील घरांमध्ये 'जुन्या पेजर्स'मध्ये स्फोट झाल्याचे वृत्त एनएनएने दिले आहे. अनेक जखमींना राजधानी बेरूत आणि बालबेक येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
एनएनएच्या वार्ताहराने सांगितले की मध्य बेका येथील अली अल-नहारी गावात रस्त्याच्या कडेला एका डिव्हाईसचा स्फोट झाला. त्यात दोन लोक जखमी झाले. दुसऱ्या वार्ताहराने सांगितले की दक्षिणी बेका येथील झैदेत मर्जेयॉनच्या स्मशानभूमीजवळ एका कारमध्ये पेजरचा स्फोट झाला. दक्षिण लेबनानच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावर असलेल्या सिडॉनमधील एका फोनच्या दुकानातून धूर निघत असल्याची चित्रे समोर आली. धुराचे लोट वाढण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी लेबनानमध्ये गेल्या तासाभरात नव्याने काही डिव्हाईसमध्ये स्फोट झाले आहेत.