पेजरमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमुळे निर्माण झालेलं भीतीचं वातावरण निवळण्यापूर्वीच वॉकी टॉकीसह घरात ठेवलेल्या टीव्ही, फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होत असल्याने लेबेनॉनमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. देशामध्ये भीतीचं वातावरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की ज्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडील वॉकी टॉकी, टीव्ही रिमोट यांमधूनही बॅटरी काढून फेकत आहेत. दुसरीकडे बेरूतमध्ये मेडिकल सेंटरच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या तांदळाच्या गोण्या त्यामध्ये स्फोटकं असल्याच्या संशयावरून लेबेनॉनच्या सैन्याने स्फोट करून नष्ट केल्या आहेत.
लेबेनॉनमधून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये लोक घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रांमध्ये स्फोट झाल्याचा दावा करत आहेत. किचनमधील काही उपकरणेही स्फोटांमुळे फुटल्याचा दावा लोकांकडून केला जात आहे.
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी हिजबुल्लाहच्या कमांडरच्या अंत्ययात्रेमध्ये अचानक अनेक वॉकी टॉकींचा स्फोट झाला होता. त्यात सुमारे १४ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ४५० इतर जखमी झाले होते. त्याआधी येथे शेकडो पेजर्समध्ये ब्लास्ट झाल्याचा प्रकार घडला होता. त्यात किमान ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २८०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
एका वृत्तानुसार एका दिवसापूर्वी पेजरच्या स्फोटात मारल्या गेलेल्या हिजबुल्लाहच्या तीन सदस्यांसह एका मुलाला दफन करण्याची तयारी सुरू असतानाच अनेक स्फोट झाले होते. हे स्फोट वॉकी टॉकी आणि सोलर डिव्हाइसमध्ये झाले होते. काही स्फोट एवढे तीव्र होते की त्यामध्ये एक कार आणि मोबाईल फोनचं दुकान पूर्णपणे नष्ट झालं.
दरम्यान, लेबेनॉनमधील अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये बेरूत आणि दक्षिण लेबेनॉनमधील अनेक भागात सोलर सिस्टिममध्ये स्फोट झाल्याचे तसेच या स्फोटांमध्ये एक मुलगी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.